राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन गेल्यावर्षी नगर तर यावर्षी पुण्यात, गेल्यावर्षी जंयत पाटील चर्चेत, यावर्षी स्वत: पवार आणि सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा यावर्षीचा वर्धापन दिन १० जून रोजी पुण्यात होत आहे. पक्षाचा हा २६ वा वर्धापन दिन आहे. गेल्यावर्षीचा वर्धापनदिन अहिल्यानगरमध्ये झाला होता. लोकसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष आणि वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम होता. लोकसभा निवडणुकीत या पक्षाने १० जागा लढवत ८ जागी विजय मिळविला. त्यातील अहिल्यानगरची प्रतिष्ठेची जागा पक्षाने जिंकली होती. त्यामुळे सर्व विजयी उमेदवारांना नगरला बोलावून नगरमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातील सुप्त संघर्षाला उघड तोंड फुटल्याचे पहायला मिळाले होते. आमदार पवार यांनी त्यापूर्वी अनेकदा जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणारी वक्तव्य सोशल मीडियातून केलेली होती. प्रदेशाध्यक्षपद बदलाचा सूर त्यातून उमटलेला होता. तर दुसरीकडे या पदासाठी रोहित पवार यांच्या नावाची त्यांच्या काही कार्यकर्तांमधून चर्चा सुरू झाली होती. याचा संदर्भ देत मिळालेल्या संधीचा फायदा घेत जयंत पाटील यांनी यावर जाहीर भाष्य केले होते. आपण आता काही दिवसच या पदावर राहणार आहोत. लवकरच हे पद सोडणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला याबद्दल बोलायचे आहे, त्यांनी पक्षाच्या पातळीवर बोलावे. माझ्याबद्दल काही तक्रार असेल तर ती थेट अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करावी. ते मला आदेश देतील त्याप्रमाणे मी काम करीन… असे सांगत पाटील यांनी काही दिवसांत प्रदेशाध्यक्षपद सोडणार असल्याचे संकेत दिले होते. विजय सभेच्या वातावरणातही पाटील यांच्या या वक्तव्याचीच त्यावेळी अधिक चर्चा झाली होती.
याला आता एक वर्ष झाले. मधल्या काळात विधानसभा निवडणूक झाली. त्याचा निकालही महाराष्ट्राच्या समोर आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडणे न सोडणे, त्यांची कामाची पद्धत वगैरे संबंधी जाहीर चर्चा झालीच नाही. उलट गेल्या काही काळापासून पाटील यांच्या भाजप प्रवेशाचीच चर्चा अधिक सुरू आहे. मधल्या काळात ती जोरकसपणे सुरू होती. त्यामुळे गेल्या वर्षभरातील बराच काळ पाटील यांच्याभोवती फिरणारा ठरला.
त्यानंतर मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण, शरद पवार यांची भाजपशी जवळीक ते थेट खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार… इथपर्यंत चर्चा पोहचली आहे,
आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा यावर्षीचा वर्धापन दिन होत आहे. त्यात नेमके काय होणार? याकडे आता लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा