सोशल मीडियात
सध्या संप हा विषय चर्चेत आहे. 'सर्वांचे संप करून झाले, आता शेतकऱ्यांचा संप कसा
असतो ते पहा...' अशा पोस्ट फिरत आहेत. विशेष म्हणजे काही राजकीय मंडळीही
शेतकऱ्यांच्या संपाची भिती घालत आहेत. पण येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खरंच
शेतकरी संप करू शकतो का? तर नाही. प्रसिद्धी आणि राजकारणासाठी म्हणून ठीक आहे,
प्रत्यक्षात खरा शेतकरी कधीच संप करू शकत नाही. याचे कारण त्याच्या जीवन पद्धतीत दडले
आहे. शेतकऱ्यांच्या संपावर बोलणाऱ्यांनी प्रथम हे समाजावून घेतले पाहिजे. सर्व
बाजूंनी पिचलेल्या या शेतकऱ्याचा राजकारणासाठी वापर होता कामा नये.
पहाटे उठून स्वतः
खाण्याआधी जनावरांना चारा घालणारा शेतकरी संप करील म्हणजे जनावरांना उपाशी ठेवेल
का? गायी-म्हशीचे दूध काढण्याचे थांबवून डेअरीला न घालणे म्हणजे लौकिक अर्थाने संप
म्हणता येईल. प्रत्यक्षात शेतकरी असे करू शकेल का? याचा त्रास दुधावाचून राहणाऱ्या
माणसांपेक्षा दुभत्या जनावरांना होणार नाही का? त्यांना चारा आणि खुराक देण्याचे
शेतकरी थांबवू शकेल का? शेतात उभे पीक जळताना पाहून संपावर आहे म्हणून पाणी न
सोडण्याचे अघोरी धाडस शेतकरी करू शकेल का? ज्या पेरणीवर पुढच संपूर्ण वर्ष अवलंबून
असले, ती पेरणी करण्याचे तो थांबवू शकेल का?
अशी किती तरी
उदाहरणे आहेत, ही शेतकऱ्यांची कामे नाहीत, रोजचे जगणे आहे. पाट्या टाकू
कर्मचाऱ्यांसारखी त्याची अवस्था नाही. दारातील गाय आणि काळीआई हेच त्याचे दैवत
आहे, त्याचे जगणे आहे. कोणाला अद्दल घडविण्यासाठी म्हणून किंवा कोणाच्या
राजकारणासाठी त्यांच्याशी प्रातारणा करण्याची चूक खरा शेतकरी कधीच करू शकणार नाही.
चित्रपटांत दिसणारा, माध्यमांतून रंगविला जाणारा, राजकारणासाठी वापरला जाणारा,
खते-बियाण्यांच्या जाहिरातीत दिसणारा शेतकरी वेगळा आहे. रानात राबणारा, शेतात
रमणारा आणि सारं संपले म्हणून प्रसंगी स्वतः संपवून घेणारा शेतकरी वेगळा आहे
राजे...! पगारदार, व्यावसायिक, राजकारणी यांच्या संपाशी शेतकऱ्याची तुलना करू नये.
एक- दोन दिवसांच्या संपाने यांचे काही बिघडत नाही. संप केला तरी पगार मिळतो,
जगण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. हातावरचे पोट असणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात
संपाचा विचारही येऊ शकत नाही, त्यामुळे इतरांनी त्याची उठाठेव करण्यात काय अर्थ
आहे?
- विजयसिंह होलम

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा