सैनिकाचे जीवन किती कष्टवत आहे, याची परिपूर्ण जाणीव असूनही हजारो
तरूण जिद्दीने सैन्यात भरती होतात. देशाची सेवा करता करता स्वतःचा संसार चालविण्यासाठी
त्यांना हा मार्ग निवडलेला असतो. केवळ झपाटलेले, ध्येयवेड तरुणच हा मार्ग स्वीकारू
शकतात. उरलेले आमदार-खासदारांच्या मागेपुढे फिरत असतात. तरुणांना लाचार बनविणाऱ्या
या राजकारण्यांना सैनिकांची जिगर कशी कळणार?
आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल
केलेल्या निर्लज्ज विधानाबद्दल त्यांची सर्वत्र छी थू झाली. अर्थात यात
सैनिकांबद्दलची आस्था, प्रेम यासोबतच राजकीय कारणही आहे, हे नाकारून चालणार नाही. सध्याचे
राजकारण पहता त्यांच्याकडून सैनिकांना न्याय आणि सन्मान मिळेल, याची खात्री देता
येत नाही. राजकारणासाठी लाचारांची फौज तयार करणाऱ्या, शेकडो तरुणांना भुलथापा देत
आपल्या मागेपुढे फिरायला लावणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना सैनिकांचे खरे जीवन
कळणार नाही, त्यांची जिद्द त्यांना कळणार नाही. किमान त्यांचा सन्मान नका करू पण
त्यांची निंदा नालस्ती तरी करू नये, एवढीही भान या लोकांना राहिले नाही. एका
सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे हे विधान किती दूरगामी परिणाम करणारे ठरू शकते, याची
जाणीव तरी ठेवली पाहिजे.
कोण असतात हे सैनिक? का भरती होतात ते सैन्यात? त्यांना
उपजिविकेचा दुसरा मार्ग नसतो का? हे जीवन एवढे कष्टवत आहे याची जाणीव असूनही
त्यांचे आई-वडील त्यांना सैन्यात पाठविण्यास का तयार होतात? हातावर जीव घेऊन
लढणाऱ्या या सैनिकांशी विवाह करण्यास त्या जिगरबाज तरूणी का तयार होतात? लाडात
वाढविलेली आपली लेक सैनिकाच्या घरात देण्यास आई-वडील कसे तयार होतात? या मागे जी
काही प्रेरणा आहे, जो काही त्याग आहे तो या शब्दांचे खेळ करून मते मिळविणाऱ्या
राजकारण्यांना आणि ऐषोआरामात जीवन घालविणाऱ्यांना कसा कळणार? यांनी कधी सैनिकाच्या
घरी जाऊन पाहिले आहे काय? त्यांचा प्रचारासाठी, मतांसाठी उपयोग होत नाही, म्हणून हे
तेथे कशाला जातील? त्यांचे कुटुंबीय कसे आहेत, कोणत्या अडचणींना तोंड देत आहेत, हे
यांनी कधी पाहिले आहे? जेव्हा युद्ध होते, अतिरेक्यांविरूद्ध कारवाई होते, त्यात
आपले सैनिक शहीद किंवा जखमी होतात, तेव्हा आपल्याला त्यांची आठवण होते. त्यांच्याच
जीवावर आपण देशात सुरक्षित असल्याचे भावना तयार होते. त्यावेळी जी सैनिकांप्रती
प्रेम व्यक्त करण्याची लाट येते, ती सैनिकांना दिलासा देणारी असते.(मुळात सैनिक
अशा अपेक्षेने भरती झालेलेच नसतात) तर दुसरीकडे अशी विधाने त्यांचे मनोधैर्य खच्ची
करणारे ठरते. आमदार साहेब, तुम्ही केवळ सैनिकांचा अपमान केला नाही, त्यांच्या
पत्नींचाही अपमान केला नाही तर भविष्यात सैनिक होऊ पाहणारे तरुण त्यांची पत्नी होऊ
पाहणाऱ्या तरुणींच्या मनोधैर्यावर घाला घातला आहे. मागे एकदा गाजलेला नट म्हणाला
होता, आम्ही म्हटले का त्यांना सैन्यात भरती व्हा... कसे बोलतात हे लोक? अरे, हे
झपाटलेले तरूण हातावर जीव घेऊन लढतात म्हणून आपण या देशात राहू शकतो. त्यांना
प्रोत्साहन देण्याचे सोडून त्यांचा अपमान करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचे
किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव तरी यांना आहे का? अशा लोकांना
लोकप्रतिनिधी कसे म्हणावे? यांच्या हातात कारभार कसा सोपवावा? आता यांना निलंबित
केले काय, बडतर्फ केले काय आणि तुरुंगात डांबले काय जो संदेश जायचा तो गेलाच आहे. जे
संशयाचे वातावरण निर्माण व्हायचे ते झालेच आहे. एकट्या आमदाराने नव्हे संपूर्ण
देशाने सैनिकांची माफी मागितली तरी याची भरपाई होऊ शकत नाही. अशा वृत्ती ठेचून
काढल्या पाहिजेत. यासाठी सैनिकांच्या प्रतीक्षा करण्याची गरज नाही, जनतेनेच हे काम
केले पाहिजे.
- विजयसिंह होलम
- विजयसिंह होलम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा