गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

‘ऑफलाइन’ शिक्षकांचे काय?

ऑनलाइन शिक्षणाचा मुद्दा निघाला की ऑनलाइनची सुविधा नसलेल्या किंवा ती घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा होते. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, असा मुद्दा मांडला जातो. तो खराही आहे. मात्र या गडबडीत शिक्षकांच्याही मर्यादांवर चर्चा करायची राहून जात आहे. कित्येक शिक्षक स्वत:च ‘ऑफलाइन’ आहेत, ते विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे देऊ शकणार? यासंबंधी काय तयारी सुरू आहे? असे शिक्षक स्वत: प्रशिक्षित होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत का? मुळात या प्रवाहापासून ते इतके दिवस बाजूला का राहिले?

शहर असो की ग्रामीण भाग. दोन्हीकडे असे अनेक शिक्षक आहेत. कित्येकांना स्वत:चा इमेल आयडी नाही, इंटरनेटबद्दल माहिती नाही, सध्या ज्या सोशल मीडियाचा बोलबाला सुरू आहे, त्यापासूनही ते दूर आहेत. असे अनेक ज्येष्ठ शिक्षक आहेत, की जे व्हॉटसॅपसारखे मेसेजिंग अप्लिकेशन्सही वापरत नाहीत. ज्ञानाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंटरनेट विश्वापासून ते कोसो दूर आहेत. अभ्यासक्रमाची पुस्तके, त्यावर काढलेल्या नोटस, अधून मधून सरकारी पातळीवर आयोजित केली जाणारी प्रशिक्षणे यावरच ते अवलंबून असतात. त्यांच्याकडून ऑनलाइन शिक्षणाची कशी अपेक्षा करणार? (सध्या ऑनलाइन शिक्षण देण्याशिवाय पर्याय नाही आणि शाळेने सक्ती केली म्हणून कित्येक शिक्षकांनी या कामाला आपल्या मुला-मुलींना जुंपले आहे, तर काहींनी यातील माहितगार खासगी व्यक्तींची पैसे मोजून मदत घेतली आहे.)
अभ्यासक्रमात नवीन काही आले तर त्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. बरीच शिक्षक मंडळी कशीबशी याला हजेरी लावतात. अशा प्रशिक्षण शिबिरात काय माहिती मिळाली, काय शिकले, नवीन काय मांडले यापेक्षा तेथील जेवण आणि सोयी-सुविधांचीच अधिक चर्चा होते.
अर्थात शिक्षकांचेही अनेक प्रश्न आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांसह इतर अनेक अडचणी आहेत. त्याही सुटल्या पाहिजेत, हे खरे असले तरी स्वत:च्. क्षमता विस्तारासाठी शिक्षकांनीही काही प्रयत्न करायला नको का? कित्येक शिक्षक ऑनलाइनमध्ये विविध प्रयोग करीत आहेत, शोध लावत आहेत, त्याचा त्यांच्यासह विद्यार्थ्यांना आणि समाजाला उपयोग होत आहे. तर दुसरीकडे ‘ऑफलाइन’ शिक्षकांची संख्याही मोठी आहे.