रविवार, २१ जून, २०२०

अंधारलेल्या जगात फक्त ‘फेकाफेकी’

सध्या जगातच अंधारून आलेले आहे. महासत्ता म्हणविणाऱ्यांनाही पुढील वाट दिसत नाही. करोनाचे संकट आत्ता आलेले आहे, मात्र या अंधाऱ्या ग्रहणाचे वेध पूर्वीपासूनच लागलेले होते. मोक्षाची वाट अद्याप तरी कोणाला दिसलेली नाही. असे असूनही या अंधारातच सर्वत्र फेकाफेकी मात्र सुरू आहे. जगातील सध्याच्या घडामोडी, तेथील सरकारे, नेते, राजकीय पक्ष, त्यांचे शत्रू, त्यांचे मित्र या सगळ्यांचे काय चालले आहे, हे जर बारकाईने पाहिले तर सर्वत्र एक प्रकारे अंधारात ‘फेकाफेकी’च सुरू असल्याचे दिसून येते….

 आज (रविवारी) सूर्यग्रहण झाले. सकाळी सुरू झालेले हे ग्रहण दुपारी संपलेही. काही काळ निर्माण झालेला अंध:कार दूरही झाला. एक अविष्कार संपवून निसर्गाची पुढील अविष्कारासाठीची वाटचाल सुरू झाली. मधल्या काळात याच निसर्गाचा घटक असलेल्या माणसाने आपापल्या परीने ग्रहण पाहिले, अनुभवले आणि कोणी पा‌ळलेही. नेहमीप्रमाणेच या विषयावर फेकाफेकी पद्धतीच्या चर्चाही झडल्या. आपलेच खरे म्हणणारे आणि तेच दुसऱ्यांवर थापणारे तज्ज्ञ ‘अंधाराचा’ फायदा घेऊन फेकत राहिले. प्रत्येकाचा विचार ऐकला पाहिजे, श्रद्धेचा आदर केला पाहिजे, हे जरी खरे असले तरी यामुळे चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण तर होणार नाही ना? नव्याने ग्रहण समजावून घेणाऱ्या पिढीवर आपण निराधार, जुने विचार लादत तर नाही ना? याचाही विचार केला पाहिजे. हे विचार जुने आहेत, न पटणारे आहेत, निराधार आहेत, हे बहुतेक चर्चांतून एकप्रकारे मान्य केल्याचे दिसून येते. मात्र, केवळ त्यांच्या श्रद्धेचा आदर करायचा, त्यांचेही ऐकून घ्यायचे या कारणासाठी संधी दिली, असे सांगतात. हे विचार जुन्या काळाशी सुसंगत होते, तेव्हा नवीन शोध, नवी माहिती मिळाली नव्हती, असे सांगून त्यांच्या जुनेपणावर शिक्कामोर्तब करायचा पण तरीही ते नव्या पिढीच्या समोर मांडून त्यांचा बुध्दीभेद करायचा ही फेकाफेकीच नाही तर काय?

असो, हे झाले ग्रहणापुरते. मात्र, सध्या जगातच अंधारून आलेले आहे. महासत्ता म्हणविणाऱ्यांनाही पुढील वाट दिसत नाही. करोनाचे संकट आत्ता आलेले आहे, मात्र या अंधाऱ्या ग्रहणाचे वेध पूर्वीपासूनच लागलेले होते. मोक्षाची वाट अद्याप तरी कोणाला दिसलेली नाही. असे असूनही या अंधारातच सर्वत्र फेकाफेकी मात्र सुरू आहे. जगातील सध्याच्या घडामोडी, तेथील सरकारे, नेते, राजकीय पक्ष, त्यांचे शत्रू, त्यांचे मित्र या सगळ्यांचे काय चालले आहे, हे जर बारकाईने पाहिले तर सर्वत्र एक प्रकारे अंधारात ‘फेकाफेकी’च सुरू असल्याचे दिसून येते.

नेतृत्वाला स्वत:ला रस्ता सापडत नाही. आपल्या देशाला, जनतेला आपण कोठे घेऊन जात आहोत, आपल्या राजकारणासाठी, सत्ता टिकविण्यासाठी, पुन्हा मिळविण्यासाठी, आपली हुकुमशाही कायम ठेवण्यासाठी, जगावर वर्चस्वासाठी याही अंधारात आपण जी फेकाफेकी करतोय ती आपल्या देशासोबत आपलीही फसवणूक तर नाही ना? याचा विसर या बहुतांश देशांच्या नेतृत्वाला पडला आहे. कोणी महासत्तेचा दावा करणारा, कोणी अणुबॉम्बधारी, कोणी लोकसंख्येच्या ब‌ळावर, जगाची बाजारपेठ ताब्यात असल्याच्या जोरावर फुशारकी मारणारे असो सग‌ळेच सध्या एका अंधकारमय रस्त्यावर आहेत. कोणाचीच वाट स्पष्ट नाही. मात्र, हे मान्य करण्याची अडचण असल्याने फेकाफेकीशिवाय दुसरा उपाय त्यांना सापडत नाही. मग याच अंधारात जगाचा अंत जवळ आल्याची हाकाटी पिटण्यात येते. एकूण घटना घडमोडींचा संदर्भ लक्षात घेऊन हळवी आणि अंधश्रद्धाळूपणे मने यावर विश्वास ठेवतात. ज्यांचा धंदा यावर अवलंबून आहे, ती मंडळी याचा गैरफायदा उठवतात. ज्यांचा विवेक जागा आहे, त्यांना हे पटत नाही. मात्र, समोरच्या अंधारात प्रकाश निर्माण करण्याएवढे सामर्थ्य त्यांच्याही विचारात उरलेले नाही.

अशाच अंधारातून मग कोणी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आता सगळेच संपले, असे वाटून ही मंडळी अंधाराला कायमचे कवटाळत आहेत. कर्जबाजारी झालेला गरीबीत आयुष्य काढलेला शेतकरी असो की कोट्यधीश सेलिब्रिटी, एकदा डोळ्यासमोर अंधार आला की भविष्यातील प्रकाशाचा वेध घेण्याची दृष्टीच नाहीशी होते. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलले जाते. हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. पुढे यावरूनही फेकाफेकी सुरूच राहते. असे म्हणतात की प्रकाश झाकता येत नाही. छोट्याशा पणतीत सुद्धा अंधार भेदण्याची क्षमता असते. त्यामुळे सध्याचा अंधार म्हणजे ग्रहण आहे. ग्रहण आहे म्हणजे त्याला मोक्ष असणारच. म्हणून अंधारात फेकाफेकी करण्यापेक्षा वास्तव स्वीकारले पाहिजे, तोच मार्ग प्रकाशाकडे घेऊन जाईल. नाही का?

सोमवार, ८ जून, २०२०

ऑनलाइनचं नवं दुकान…

करोनातून सावरत हळूहळू जग उभं राहू लागलं आहे. पण, आता ते बदललेलं असणार हे नक्की. त्याची चिन्हं दिसू लागलीत. जसं पहिले होतं, ते सर्व जशाच्या तसं आता नव्या जगात नसेल, हे मात्र नक्की. काही नवं स्वीकारलेलं असेल, काही अति जुनेही पुन्हा बाहेर काढलं जाईल. सगळं काही नॉर्मल झालं तरी तेही नवंच असणार आहे. त्यामुळंच याला आता ‘न्यू नॉर्मल’ म्हटलं जाऊ लागलंय.

या अनेक बदलांमध्ये आहे तो म्हणजे ऑनलाइन माध्यमांचा जास्तीत जास्त वापर. आपल्या देशात नोटबंदी आली, तेव्हा डिजिटल इंडियाची घोषणाही झाली होती. लोकांनी गरज म्हणून, नाइलाज म्हणून ऑनलाइन पेमेंटची पद्धती स्वीकारली होती. त्यासाठी अनेकांनी मोठा खर्चही केला. नवी साधन घेतली, नवे तंत्र शिकून घेतलं. आता हेच ‘न्यू नॉर्मल’ असेल असं त्यावेळी बोलण्यात येत होतं. त्यामुळे ऑनलाइनला पूर्वी नव्हतं एवढं महत्व त्या काळात आलं होतं. पुढे काय झालं? सगळं काही नॉर्मल झालं आणि हळूहळू हे डिजिटल प्रकरण मागे पडलं. काही दिवसांतच आपल्या लोकांनी जुनी वाट धरली. पण मधल्या काळात जे चित्र निर्मणा केलं गेलं, त्यातून सर्वांनीच धास्ती घेतली. थोडा काळ का होइना अनेकांनी डिजिटल तंत्राची वाट धरली होती. यातून या क्षेत्रातील संबंधितांची ‘दुकाने’ चांगलीच चालली.

आता करोनातून सावरतानाही पुन्हा हीच ऑनलाइनची हाकाटी आली आहे. एका बाजूला याचं समर्थन तर दुसरीकडं अनंत अडचणी सांगत विरोध सुरू आहे. अन्य व्यवहारांसोबत शिक्षणासंबंधी याची जास्त चर्चा आहे. अर्थात आपल्याकडं शिक्षण हा कृतीपेक्षा चर्चेचाच विषय अधिक असतो. अभ्यासक्रम, शिक्षणाची पद्धती, शिक्षक भरती, नवं धोरण, प्रगती, वाटचाल हे सर्व सतत चर्चेचे विषय असतात. ही चर्चा किती फायद्याची किती तोट्याची याची चर्चा येथे नको. मात्र, सध्या ऑनलाइन शिक्षणासंबंधीही अशीच चर्चा आहे. याचे परिणाम, दुष्परिणामांची चर्चा होत आहे. त्यातील अनेक मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत. प्रत्यक्ष वर्ग भरविता येत नाहीत. त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइनसारखा पर्याय शोधला पाहिजे. मात्र, असे करता यामागील दुकानदारी, त्याच्या मर्यादा, त्यामुळं वंचित राहणारा वर्ग यांचाही विचार झालाच पाहिजे. कारण जशी ऑनलाइन शिक्षणाची चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी प्रयोग सुरू झाले, तशी या क्षेत्राकडं पैसा कमाविण्याचं साधन म्हणूनही पाहिलं जाऊ लागलं आहे. अर्थात व्यवसाय करण्याचे नव्या संधी शोधण्याचे सर्वांना स्वांतत्र्य आहे. मात्र, नागरिक आणि सरकारच्या असाह्यतेचा फायदा उठवून दुकानदारी होता कामा नये. आधीच शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारची ‘दुकानदारी’ कमी नाही. त्यात ही नवी भर पडणार, अशी चिन्हं आहेत. अर्थात हेही ‘न्यू नॉर्मल’ किती दिवस टिकणार, की नोटाबंदीनंतरच्या डिजिटायझेशनसारखं तेही अल्पजिवी ठरणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, याचा बाऊ करून कोणी आताच ‘दुकानदारी’ उरकून घेत असेल तर त्याचा गांभीर्यानं विचार करून सुरवातीपासूनच त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही उभारण्याची गरज आहे.