रविवार, २१ जून, २०२०

अंधारलेल्या जगात फक्त ‘फेकाफेकी’

सध्या जगातच अंधारून आलेले आहे. महासत्ता म्हणविणाऱ्यांनाही पुढील वाट दिसत नाही. करोनाचे संकट आत्ता आलेले आहे, मात्र या अंधाऱ्या ग्रहणाचे वेध पूर्वीपासूनच लागलेले होते. मोक्षाची वाट अद्याप तरी कोणाला दिसलेली नाही. असे असूनही या अंधारातच सर्वत्र फेकाफेकी मात्र सुरू आहे. जगातील सध्याच्या घडामोडी, तेथील सरकारे, नेते, राजकीय पक्ष, त्यांचे शत्रू, त्यांचे मित्र या सगळ्यांचे काय चालले आहे, हे जर बारकाईने पाहिले तर सर्वत्र एक प्रकारे अंधारात ‘फेकाफेकी’च सुरू असल्याचे दिसून येते….

 आज (रविवारी) सूर्यग्रहण झाले. सकाळी सुरू झालेले हे ग्रहण दुपारी संपलेही. काही काळ निर्माण झालेला अंध:कार दूरही झाला. एक अविष्कार संपवून निसर्गाची पुढील अविष्कारासाठीची वाटचाल सुरू झाली. मधल्या काळात याच निसर्गाचा घटक असलेल्या माणसाने आपापल्या परीने ग्रहण पाहिले, अनुभवले आणि कोणी पा‌ळलेही. नेहमीप्रमाणेच या विषयावर फेकाफेकी पद्धतीच्या चर्चाही झडल्या. आपलेच खरे म्हणणारे आणि तेच दुसऱ्यांवर थापणारे तज्ज्ञ ‘अंधाराचा’ फायदा घेऊन फेकत राहिले. प्रत्येकाचा विचार ऐकला पाहिजे, श्रद्धेचा आदर केला पाहिजे, हे जरी खरे असले तरी यामुळे चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण तर होणार नाही ना? नव्याने ग्रहण समजावून घेणाऱ्या पिढीवर आपण निराधार, जुने विचार लादत तर नाही ना? याचाही विचार केला पाहिजे. हे विचार जुने आहेत, न पटणारे आहेत, निराधार आहेत, हे बहुतेक चर्चांतून एकप्रकारे मान्य केल्याचे दिसून येते. मात्र, केवळ त्यांच्या श्रद्धेचा आदर करायचा, त्यांचेही ऐकून घ्यायचे या कारणासाठी संधी दिली, असे सांगतात. हे विचार जुन्या काळाशी सुसंगत होते, तेव्हा नवीन शोध, नवी माहिती मिळाली नव्हती, असे सांगून त्यांच्या जुनेपणावर शिक्कामोर्तब करायचा पण तरीही ते नव्या पिढीच्या समोर मांडून त्यांचा बुध्दीभेद करायचा ही फेकाफेकीच नाही तर काय?

असो, हे झाले ग्रहणापुरते. मात्र, सध्या जगातच अंधारून आलेले आहे. महासत्ता म्हणविणाऱ्यांनाही पुढील वाट दिसत नाही. करोनाचे संकट आत्ता आलेले आहे, मात्र या अंधाऱ्या ग्रहणाचे वेध पूर्वीपासूनच लागलेले होते. मोक्षाची वाट अद्याप तरी कोणाला दिसलेली नाही. असे असूनही या अंधारातच सर्वत्र फेकाफेकी मात्र सुरू आहे. जगातील सध्याच्या घडामोडी, तेथील सरकारे, नेते, राजकीय पक्ष, त्यांचे शत्रू, त्यांचे मित्र या सगळ्यांचे काय चालले आहे, हे जर बारकाईने पाहिले तर सर्वत्र एक प्रकारे अंधारात ‘फेकाफेकी’च सुरू असल्याचे दिसून येते.

नेतृत्वाला स्वत:ला रस्ता सापडत नाही. आपल्या देशाला, जनतेला आपण कोठे घेऊन जात आहोत, आपल्या राजकारणासाठी, सत्ता टिकविण्यासाठी, पुन्हा मिळविण्यासाठी, आपली हुकुमशाही कायम ठेवण्यासाठी, जगावर वर्चस्वासाठी याही अंधारात आपण जी फेकाफेकी करतोय ती आपल्या देशासोबत आपलीही फसवणूक तर नाही ना? याचा विसर या बहुतांश देशांच्या नेतृत्वाला पडला आहे. कोणी महासत्तेचा दावा करणारा, कोणी अणुबॉम्बधारी, कोणी लोकसंख्येच्या ब‌ळावर, जगाची बाजारपेठ ताब्यात असल्याच्या जोरावर फुशारकी मारणारे असो सग‌ळेच सध्या एका अंधकारमय रस्त्यावर आहेत. कोणाचीच वाट स्पष्ट नाही. मात्र, हे मान्य करण्याची अडचण असल्याने फेकाफेकीशिवाय दुसरा उपाय त्यांना सापडत नाही. मग याच अंधारात जगाचा अंत जवळ आल्याची हाकाटी पिटण्यात येते. एकूण घटना घडमोडींचा संदर्भ लक्षात घेऊन हळवी आणि अंधश्रद्धाळूपणे मने यावर विश्वास ठेवतात. ज्यांचा धंदा यावर अवलंबून आहे, ती मंडळी याचा गैरफायदा उठवतात. ज्यांचा विवेक जागा आहे, त्यांना हे पटत नाही. मात्र, समोरच्या अंधारात प्रकाश निर्माण करण्याएवढे सामर्थ्य त्यांच्याही विचारात उरलेले नाही.

अशाच अंधारातून मग कोणी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आता सगळेच संपले, असे वाटून ही मंडळी अंधाराला कायमचे कवटाळत आहेत. कर्जबाजारी झालेला गरीबीत आयुष्य काढलेला शेतकरी असो की कोट्यधीश सेलिब्रिटी, एकदा डोळ्यासमोर अंधार आला की भविष्यातील प्रकाशाचा वेध घेण्याची दृष्टीच नाहीशी होते. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलले जाते. हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. पुढे यावरूनही फेकाफेकी सुरूच राहते. असे म्हणतात की प्रकाश झाकता येत नाही. छोट्याशा पणतीत सुद्धा अंधार भेदण्याची क्षमता असते. त्यामुळे सध्याचा अंधार म्हणजे ग्रहण आहे. ग्रहण आहे म्हणजे त्याला मोक्ष असणारच. म्हणून अंधारात फेकाफेकी करण्यापेक्षा वास्तव स्वीकारले पाहिजे, तोच मार्ग प्रकाशाकडे घेऊन जाईल. नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा