मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

शनिशिंगणापुरातील चोरीचा मामला

"सूर्यपूत्र शनिदेव' या गुलशनकुमार यांच्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या शनिशिंगणापूर (ता. नेवासे, जि. नगर) या गावातील चोरीचा मामला सध्या गाजत आहे. या गावात चोरी होत नाही, चोरी झाली तर चोर गावाबाहेर जाऊ शकत नाही, अशा अनेक अख्यायिका येथे ऐकवल्या जातात. त्या खोट्या ठरविणारी घटना 25 ऑक्‍टोबरला या गावात घडली. गुडगाव (हरयाणा) येथून आलेल्या एका भाविकाचा 35 हजारांचा ऐवज या गावातून म्हणजे मंदिर परिसरातूनच चोरी गेला. त्या भाविकाने धरलेल्या अग्रहामुळे पोलिसांनाही गुन्ह्याची नोंद करून घ्यावी लागली. चोरी करणारा एजंट म्हणजे स्थानिकच आहे. त्याला शनिच्या या महतीची माहिती नव्हती, असेही म्हणता येणार नाही.

अर्थात ही या गावातील काही पहिलीच घटना नाही. न नोंदलेल्या अनेक घटना असल्या तरी पूर्वी नोंदलेली एक घटनाही आहे. 1995 मध्ये सोनई पोलिस ठाण्यात या गावातील चोरीचा गुन्हा दाखल आहे. बबन सरकारी लोखंडे (रा. निफाड, जि. नाशिक) हे भक्त शनिशिंगणापूरला आले असता, त्यांचा पाच हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला होता. तसा गुन्हा त्यावेळी दाखल आहे.
शनिशिंगणापूरचे महत्त्व मधल्या काळात वाढविण्यात आले. त्याला कारण गुलशनकुमार यांचा चित्रपट, दूरदर्शनचा माहितीपट हे जसे आहे, तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आंदोलनही यामागील कारण आहे. या गावात चोऱ्या होत नाही, त्यामुळे घरांना दारेही नाहीत. ही पद्धत म्हणजे अंधश्रद्धा असल्याचे "अंनिस'चे म्हणने आहे. त्यामुळे 1999 मध्ये शनिशिंगणापूरचे नागरिक, हिंदुत्ववादी संघटना आणि "अंनिस' यांच्यामध्ये संघर्ष पेटला होता. आव्हान -प्रतिआव्हान देण्याचे प्रकार झाले. त्यामुळे डॉ. दाभोळकर यांनी "चला शिंगणापूरला, चोरी करायला' असे आंदोलन पुकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते साताऱ्याहून नगरपर्यंत आले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना नगरमध्येच अटक केली.
"अंनिस'च्या या आंदोलनाचा परिणाम म्हणून शनिशिंगणापूरचे प्रस्थ आणखी वाढले. तेथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत भर पडली. देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठीही चुरस निर्माण होऊ लागली. एजंटांची दादागिरी वाढली. देवस्थानचा प्रचार, प्रसार वाढत गेला. त्याचबरोबर जोडलेल्या अख्यायिका गावोगावी पोहोचल्या. त्यामुळे नेवासे तालुक्‍यातील एक साधे खेडे आणि त्यातील उपेक्षित देवस्थान देशाच्या नकाशावर पोचले. शिर्डीत येणारे भाविक शिंगणापूरलाही येऊ लागले. एकूणच गावाचे महत्त्व वाढत गेले. हे होत असताना घरांना दारे न बसविण्याची प्रथा गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक सुरू ठेवली. तेथे झालेल्या सरकारी इमारतींनाही पोलिस चौकीसह दारे नाहीत. दुकानांनाही दारे नाहीत. गावात चोरी होत नाही, चोरी झाली तर शनिदेव चोराला शिक्षा करतो, असे सांगितले जाते. त्यामुळे काही चोरीची घटना घडली तरी शक्‍यतो संबंधितांनी पोलिस ठाण्यापर्यंत जाऊ नये, असे वातावरण केले जाते. गावाची ही "महती' जपण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कित्येक घटना घडूनही त्यांची नोंद केली जात नसल्याचे सांगण्यात येते. काही महिन्यांपूर्वी याच गावात वाहन चोरण्याचा प्रयत्न झाला होता. दुर्दैवाने त्या वाहनाला अपघात होऊन चोरटे तेथेच पकडले गेले होते. ही घटना पुढे करून पुन्हा एकदा शनिच्या महतीला दुजोरा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला होता.
आता नुकत्याच घडलेल्या चोरीबद्दलही गावकरी सारवासारव करीत आहेत. चोराला शनिदेव नक्की शिक्षा करेल असा विश्‍वास व्यक्त करताना यामुळे भाविकांच्या मनात कोणताही संदेह निर्माण होणार नाही, असा आशावादही व्यक्त केला जात आहे. एकूणच शनिशिंगणापुरातील हा चोरीचा मामला सध्या चांगलाच गाजत आहे. अंध श्रद्धा निर्मूलन समितीने मात्र यावर अद्याप काहीही भाष्य केले नाही, याचेही आश्‍चर्य वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा