नगर जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या बलात्काराच्या घटनांतील आरोपी कोणी मोठ्या घरची लाडवलेली पोरं, राजकीय कार्यकर्त्यांनी पोसलेले गुंड नाहीत, तर दोन वेळच्या जेवणाची ज्यांना भ्रांत आहे असे आरोपी असल्याचे आढळून आले आहे.
राजकारण, सहकार, ऊस
अशा कारणांसाठी प्रसिद्ध असलेला नगर जिल्हा अलीकडे वेगळ्याच कारणांनी गाजू लागला
आहे. काही काळापूर्वी जातीय संघर्षाचा ठपका ठेवला गेल्यानंतर आता महिलांवरील
विशेषतः शालेय मुलींवरील अत्याचाराचा कलंक नगर जिल्ह्याला लागला आहे. कोपर्डीची
घटना सर्वत्र गाजली. राज्यभर निषेध मोर्चे निघाले, कोर्टातील
खटला अंतिम टप्प्यात आला आहे. असे असूनही त्यानंतरही जिल्ह्यात अशा घटना
थांबलेल्या नाहीत. कोपर्डीनंतर पंधरा दिवसांतच जिल्ह्यात विविध ठिकाणी विनयभंग आणि
बलात्काराच्याही घटना घडल्या. घटनेला एक वर्ष होत असताना तिसगाव येथील शाळकरी
मुलीवर अत्याचाराची घटना घडली. शाळेत निघालेल्या या मुलीला लिफ्ट दिलेल्या
दुचाकीस्वारानेच तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला शाळेजवळ सोडून दिले. या
घटनेच्या तिसऱ्याच दिवशी मिरावली पहाड येथे दर्शनासाठी आलेल्या ६५ वर्षांच्या
महिलेवर लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारानेच बलात्कार केला. याशिवाय पोलिसांकडे दाखल
होऊन दुर्लक्षित राहिलेल्या आणि दाखल न झालेल्याही कित्येक घटना असतील.
अशा घटना नगर जिल्ह्यात सातत्याने का
घडत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला
आहे. याचे उत्तर नगर जिल्ह्यातील सुबत्ता, राजकीय
शक्ती, वर्चस्ववाद यांत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मात्र, घडलेल्या घटनांच्या मुळाशी गेले तर केवळ या
दृष्टीने अशा घटनांकडे पाहता येणार नाही. मुली महिलांच्या असहाय्यतेचा विकृत
मनोवृत्तीने उचललेला गैरफायदा, असे या घटनांचे वर्णन करावे लागेल.
सुमारे बारा वर्षांपूर्वी नगर
जिल्ह्यात एक सेक्स स्कँडल घडले होते. अल्पवयीन मुलींना फसवून जाळ्यात अडकविले
होते. काही वर्षांपूर्वी यातील आरोपींना शिक्षाही झाली आहे. यात मात्र बड्या घरची
मंडळी अडकलेली होती. अटक झालेल्या आरोपींमध्ये व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी, राजकारण्यांची मुले, व्यावसायिकांची मुले, व्यापारी अशी
बडी मंडळी होती. त्यानंतर घडलेल्या बलात्काराच्या घटना पाहिल्या तर अशी कोणी बडी
मंडळी त्यात अडकलेली नाहीत. उलट ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशांच्या विकृतीला अनेक कळ्या बळी पडल्याचे दिसून येते. कधी रस्त्यात
अडवून, कधी चॉकलेटच्या बहाण्याने घरात बोलावून,
कधी पळवून नेऊन, कधी
शेतात तर कधी लिफ्ट दिलेल्यांनी मुली-महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या
आहेत. या घटना घडतात, चर्चा होते, आश्वासने
मिळतात,कोर्टात खटला दाखल होतो आणि पुढे सर्वांनाच
याचा विसर पडतो. ना सरकारी पातळीवर अशा घटना टाळण्यासाठी काही उपाय केले जातात,
ना सामाजिक स्तरावर प्रयत्न होताना दिसतात.
मुख्य म्हणजे अशा सर्व घटनांच्या बाबतीत जिल्ह्यातील राजकारणी मंडळी कमालीची थंड
भूमिका घेतात. त्यामुळे एक प्रकारे या विकृतींना बळ मिळते, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
मानसशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक
विषमतेतून अशा विकृती वाढू शकतात. अशी विषमता नगर जिल्ह्यात आहे. सुबत्ता असली तरी
ती सर्वदूर पसरलेली नाही. जगण्यासाठी संघर्ष करावा लागणारा मोठा कष्टकरी वर्ग आहे
तसाच मोठ्या प्रमाणावर बेरोजगार वर्ग जिल्ह्यात आहे. हाताला काम नाही, डोक्यात चांगले विचार नाहीत, अशा
वेळी अन्य वाईट घटनांचे अनुकरण करणारी विकृती जन्म घेण्याची जास्त शक्यता असल्याचे
मानसशास्त्रज्ञांना वाटते.
दुसरीकडे स्त्रियांकडे पाहण्याचा
दृष्टिकोनही वाईटच आहे. महिलांच्या छळाचे सर्वाधिक गुन्हे नगर जिल्ह्यात घडतात हे
अनेकदा पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. हुंड्यासाठी छळ, त्यासाठी होणारे नवविवाहितांचे खून, पोलिस
केसनंतर झालेली तडजोड अशा असुरक्षित वातावरणात अनेक कुटुंबातील स्त्रिया दिवस काढत
असतात. स्वतःच्या कुटुंबात असुरक्षित, बाहेर
वखवखलेल्या नजरा, शाळेची वाट असुरक्षित, अनेक ठिकाणी शिक्षकही विकृत असल्याने शाळेतील वातावरणही असुरक्षित अशा
असाहाय्य परिस्थितीत महिला जगत आहेत. त्यामुळे या पुढारलेल्या जिल्ह्यात महिलांना
मात्र घरात आणि समाजातही दुय्यम वागणूक मिळते.
तिसगावची घटना घडली तेव्हा बहुतेकांनी
प्रश्न विचारला की अनोळखी दुचाकीस्वारासोबत आईने मुलीला पाठविलेच कसे? वरकरणी प्रश्न रास्त वाटत असला तरी तेथील परिस्थिती विचारात घेतली तर
हा धोका पत्कारल्याशिवाय त्या मुलीचे शिक्षण होऊच शकणार नाही. कोपर्डीच्या बाबतीत
सायंकाळी ती मुलगी सायकलवर आजोबांच्या घरी गेली होती, तीही
अशाच अपरिहार्यतेमुळेच. अशाच अपरिहार्यतेचा, असहाय्यतेचा
विकृत मनोवृत्तींनी गैरफायदा उठविल्याचे आढळून आले आहे. कोणताही प्रबळ विरोध
होण्याची शक्यता नसलेले सावज जणू त्यांनी हेरले होते. अशा घटनांमागे मुलींचे कपडे,
रात्री घराबाहेर पडणे अशी जी कारणे तथाकथित
तज्ज्ञ मंडळी सांगतात, त्यापैकी कोणतेही येथे लागू पडत नाही.
भर दिवसा, शाळेचा गणवेश घालून निघालेल्या मुलींवर
अत्याचार झाले आहेत.
या घटना केवळ कायद्याच्या धाकाने
थांबतील असे वाटत नाही. एका घटनेतील आरोपींना अटक झालेली असताना, त्यांना फाशीसारख्या शिक्षेची मागणी सुरू असताना, काही गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या असतानाही नव्या घटना सुरूच आहेत.
आपल्याकडे घटनांचा आढावा घेऊन त्यावर नेमकेपणाने उपाय करण्यासाठी कोणी प्रयत्न
करीत नाही. कडक कायदा, कडक शिक्षा त्याही पुढे जायचे झाले तर
संबंधित गावाला संरक्षण एवढ्यापुरतीच मागणी होते, तेवढाच
विचार होतो. जेथे घटना घडली, त्याच गावालाच जणू धोका आहे, असेच वातावरण काही काळ राहते. त्यामुळे उपाययोजना फक्त त्याच
गावापुरत्या आणि तात्पुरत्या स्वरूपात राहतात. कोपर्डी आणि तिसगावला आता बस सुरू
झाली. मात्र, अद्यापही नगर जिल्ह्यातील ३५०
गावांमध्ये एसटी पोहोचलेली नाही. तेथील मुलींना कोणाची तरी लिफ्ट घेऊनच शाळा
गाठावी लागते आहे. अशा घटना का घडतात, त्या अन्य
ठिकाणी घडू नये यासाठी काय करता येईल, यावर ना मंथन
होते ना उपाय केले जातात. अत्याचाराच्या घटनेत सुद्धा जात शोधणारे, जातीच्या आधारे प्रतिक्रिया देणारे आणि यातही राजकारण, श्रेयवाद जोपसाणारे नेते-कार्यकर्ते या भूमीत आहेत, हे त्याहून दुर्दैव. एकूणच अशा घटनांकडे पाहण्याची, त्या हाताळण्याची, त्यावर उपाय करण्याची पद्धत चुकते आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यात या घटना पुन्हा पुन्हा घडत आसाव्यात. विकृत
मनोवृत्तीविरूद्ध लढा देताना ती तयार होण्याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय
करावे लागतील.
(म.टा. संवाद ३०
जुलै २०१७)
विजयराव नेमके विश्लेषण करुन आपण परिस्थितीचे गांभिर्य लक्षात आणून दिले आहे ..
उत्तर द्याहटवा