बुधवार, ४ जानेवारी, २०२३

उद्याची पत्रकारिता…


समाजमाध्यमांचा वाढता प्रसार लक्षात घेता पत्रकारितेचे महत्व कमी होईल, छापील माध्यमं अडचणीत येतील, वगैरे चर्चा अलीकडे सुरू झाल्या आहेत. मात्र, पत्रकारितेचा इतिहास आणि भविष्यातील गरज लक्षात घेतली तर यात फारसे तथ्य नाही, हे लक्षात येते. समाजमाध्यमांचा प्रसार वाढतोय, हे खरे असले तरी त्यांचा प्रभाव मात्र वाढत नाही. त्यामुळे मूळ पत्रकारिता तावून सुलाखून निघणार आणि नव्या स्वरूपात ती नक्कीच टिकून राहणार. हे बदल टिपण्याची आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल करण्याची क्षमता पत्रकारांना ठेवावी लागणार आहे.

 सुरवातीला केवळ छापील माध्यम असलेली पत्रकारिता आता बहुमाध्यमांची बनली आहे. तंत्रज्ञान बदलत गेले, तशी पत्रकारिताही बदलत गेली. पूर्वी आजची बातमी दुसऱ्या दिवशीच्या अंकात छापून आल्याशिवाय वाचकांना कळत नव्हती. शिवाय जेवढी सांगितली जाईल, तेवढीच माहिती कळत होती. त्या बाहेर माहितीचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नव्हता. त्यामुळे वाचकांना वृत्तपत्रांची प्रतीक्षा केल्याशिवाय पर्याय नव्हता. शहरातील वृत्तपत्रे दुपारी गावात पोहचायची तरीही ती ताजी म्हणून वाचली जायची. पुढे तंत्रज्ञान आणि नवी माध्यमे आली. त्यामुळे आजची बातमी आजच नव्हे लगेच थेट प्रसारण करून दाखविण्याची सोयही उपलब्ध झाली. एका बाजूला तांत्रिक बदल होत असताना दुसरीकडे वाचकांची गरज लक्षात घेऊन पत्रकारितेचे स्वरूपही बदलत गेले. पूर्वी आदेश-उपदेश असे स्वरूप असलेली पत्रकारिता आता संवादी बनली आहे. एकतर्फी आदेश-उपदेश न देता वाचकांची मते विचारात घेऊन, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांचा सहभाग असलेली पत्रकारिता आता पहायला मिळते. तंत्रज्ञान बदलले तसा खर्च वाढला. त्यामुळे उत्पन्नाची नवनवे मार्ग शोधले गेले. त्यासाठी काही तडजोडीही कराव्या लागल्या. ‘आम्ही असे करीत नाही, ही पत्रकारिता नाही,’ असे म्हणणारे माध्यम समूहही या नव्या बाजारकौशल्याचा अवलंब करू लागले. त्यामुळे झालेले बदल कुरकुरत का होईना वाचकांनीही स्वीकारले. कारण पत्रकारिता ही त्यांचीही गरज आहेच.

साध्या पद्धतीच्या माध्यमातून प्रखर विचार घेऊन येणाऱ्या पत्रकारितेची जागा चकचकीत माध्यमांतून वाचकानुनयी तसेच बाजारकौशल्याचा विचार करणाऱ्या पत्रकारितेने घेतली. हा बदलही वाचकांकडून स्वीकारला जात असताना समाजमाध्यमांचा प्रवेश झाला. पहाता पहाता त्यांचा प्रसार वाढत गेला. त्यातून प्रत्येक नागरिक पत्रकार झाला. पूर्वी वाचकांची पत्रे लिहिणाऱ्यांची संख्या मर्यादीत असायची. आता पत्रकारांच्या आधी बातमी देणारे नागरिक पत्रकार तयार झाले. घटनाघडामोडींवर समाजमाध्यमांतून चर्चा झडू लागल्या. आपल्याला काळालेली माहिती इतरांना देण्याची स्पर्धा सुरू झाली. एवढेच नव्हे तर माध्यमांवर टीका करण्यासाठीही या समाजमाध्यमांचा लोक वापर करू लागले. माध्यमांच्या आधी आपण ही बातमी देत असल्याची फुशारकी मारली जाऊ लागली. घटना घडामोडी, विविध चलचित्रे, चर्चा, विचार, राजकारण, अर्थकारण, आरोग, शिक्षण, भविष्य अशा एक ना अनेक विषयांवरील माहिती प्रसारित केली जाऊ लागली. त्यातून जणू नवी विद्यापीठेही तयार झाली. या वेगाची नशाच जणू संबंधितांना चढली. माहितीचा प्रंचड विस्फोट झाला. त्यातील खरे काय खोटे काय? हे कळेनासे झाले. फायद्यासोबत तोटेही होऊ लागले. तरीही समाजमाध्यमांच्या वेगावर स्वार झालेला हा वर्ग आता मूळ पत्रकारिता अडचणीत आल्याचे सांगू लागला. समाजातून तशी भीतीही व्यक्त केली जाऊ लागली आहे.

वास्तविक पहाता समाजमाध्यमांचा प्रसार वाढला म्हणून पत्रकरिता संपणार नाही. कारण समाज माध्यमांचा प्रसार होत असला तरी पत्रकारितेचा प्रभाव कायम आहे. ती जागा समाजमाध्यमे घेऊ शकणार नाहीत. पत्रकारितेवर प्रामुख्याने बातम्या दाबल्याचा किंवा निवडक बातम्या दाखविल्या जात असल्याचा आरोप समाजमाध्यमांतून केला जातो. मात्र, समाजमाध्यमांचा बेजबाबदारपणा अनेकदा पुढे येतो आणि त्यांची खात्री करण्यासाठी वाचकांना शेवटी प्रचलित आणि मान्यता प्राप्त माध्यमांचाच आधार घ्यावा लागतो, ही खरी माध्यमांची शक्ती आहे. तीच शक्ती माध्यमांना या समाजमाध्यमांच्या राक्षसी विस्तारतही टिकवून ठेवणारी आहे. पुढे जाऊन आता माध्यमांनीही समाजमाध्यमांच्या विश्वात प्रवेश केला आहे. त्यामुळे ती गतिशील तर झालीच, मात्र समाजमाध्यमांतून पसरविल्या जाणाऱ्या माहितीची खातरजमा करून वाचकांना चुकीच्या माहितीपासून सावध करू लागली. त्यातील सत्य काय आहे, हे सांगावे लागत आहे. त्यामुळे फॅक्टचेक हे विशेष विभाग माध्यमांना सुरू करून ते समाजमाध्यमे आणि प्रचलित माध्यमांतूनही जनतेसमोर खरेखोटे करण्याचे काम करीत आहेत.

येथूनच सुरू होतो तो उद्याच्या पत्रकारितेचा प्रवास. उद्याची पत्रकारिता ही अशी असणार आहे. खोट्याविरूदध खऱ्याची लढाई करणारी. माहितीच्या प्रचंड विस्फोटातून वाचकांना हवे ते वेचून देणारी. त्यांना भरकटण्यापासून वाचविणारी. समाज तोडायला निघालेल्या प्रवृत्तींना रोखणारी. खोडसाळपणा आणि विकृतीविरूद्ध खऱ्या माहितीच्या आधारे लढणारी. हे आव्हान पेलण्याची ताकद माध्यमांमध्ये नक्कीच आहे. माध्यमांची रचनाच तशी आहे. आली माहिती की पाठव पुढे, असा समाजमाध्यमांसारखा प्रकार माध्यमांमध्ये नाही. तेथे माहितीची खातरजमा करणारा, माहिती योग्य पद्धतीने मांडणार आणि वाचकांना समजेल, उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने सादर करणारा प्रशिक्षित कर्मचारीवर्ग आहे. वार्ताहर ते संपादक अशी यंत्रणा त्यासाठी अहोरात्र राबत असते. मुख्य म्हणजे या यंत्रणेला माध्यमांच्या जबाबदारीचे भान असते. वाचक आणि समाजाच्या हिताची जाण आणि बांधिलकीही असते. त्यामुळे योग्य तीच माहिती वाचकांपुढे जाते. समाजमाध्यमांत तसे नाही. तेथे ना प्रशिक्षित यंत्रणा असेत ना त्याचा वापर करण्याचा विवेक. तेथे असते ती केवळ आलेली माहिती पुढे पाठविण्याची स्पर्धा, नव्हे कधी कधी विकृतीच. अशा विकृत वृत्तीमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत, घडत आहेत. यातून या समाजमाध्यमांची विश्वासर्हता म्हणूनच संपत आहे. त्यामुळेच समाजमाध्यमांतून आलेल्या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी वाचक माध्यमांचा वापर करतात.

दुसरीकडे या समाजमाध्यमांचा प्रचलित माध्यमेही पुरेपूर वापर करून घेत आहेत. माहितीचा प्रमुख स्त्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. त्यावरून मिळणारी माहिती योग्य ती प्रक्रिया करून, खातरजमा करून आपल्या वाचकांपर्यंत पोहचविली जाते. नव्याने विकसित झालेल्या या समाजमाध्यमांचा आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रचलित माध्यमे पुरेपूर वापर करून घेत आहेत. हीच उद्याच्या पत्रकारितेची दिशा आहे. मात्र, त्यासोबत माध्यमांची जबाबदारीही मोठी आहे. जे समाजमाध्यमांचे झाले ते या वेगाच्या गडबडीत माध्यमांचे होऊ नये, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. याशिवाय माध्यमांवर केल्या जाणाऱ्या इतर आरोपांचे खंडण कृतीतून करण्याची जबाबदारीही माध्यमांवर आहे. बहुतांश माध्यमे भांडवलदारांच्या हाती गेल्याने त्यांना हवी तशी पत्रकारिता केली जाते, राजकीय पक्षांच्या दावणीला माध्यमे बांधली गेली आहेत, अशा स्वरूपाचे आरोप कृतीतून खोटे ठरविण्याचीही जबाबदारी माध्यमांवर असेल. अर्थात बदलते राजकारण आणि समाजव्यवस्था पहता काहीही केले तरी हे आरोप होतच राहणार आहेत. हे आरोप झेलत पुढे जाण्याची तयारी माध्यमांना ठेवावी लागणार आहे. नवी तंत्रे आणि नवे स्वरूप धारण करताना मूळ पत्रकारितेचा बाज आणि बूज राखत वाटचाल केली तर समाजमाध्यमे किंवा भविष्यात येऊ पाहणारी याहीपेक्षा वेगळी माध्यमे पत्रकारिता संपवू शकणार नाहीत, हे तितकेच खरे. वाढत्या खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी बाजारकौशल्यांचा वापर स्वाभाविक असला तरी ही रचना करताना व्यवस्थापनाकडून पत्रकारितेच्या मूळ ढाचाला हात लागणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

मात्र, ही आव्हाने वाटतात तेवढी सोपी नाहीत. यात पत्रकारांना अनेक त्रासाला समोरे जावे लागते. समाजमाध्यमांतून होणारी टीका आणि राजकीय तसेच गुंडाकडून होणारे हल्ले सहन करावे लागतात. आतापर्यंत आपण हे सहन करीत आलो. मात्र, मराठी पत्रकार परिषद या पत्रकारांच्या सर्वांत जुन्या मातृसंस्थेमार्फत या विषयावर आपले नेते एस. एम. देशमुख आणि सहकाऱ्यांनी लढा उभारला. संघटना आणि राज्यातील पत्रकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले. प्रदीर्घ लढ्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा आला. पत्रकारांच्या परखड लेखणीला या ढालीची साथ मिळाली आहे. या ढालीचे शस्त्र न करण्याची आणि मिळालेल्या संरक्षणाचा योग्य वापर करण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न आहेतच. सरकारसोबतच माध्यमांच्या व्यस्थापनासोबतही संघर्ष करावा लागत आहे. नव्याने या प्रश्नांत भर पडणार आहे. त्यासाठीही संघटनेचे पाठबळ हवे आहे. त्यामुळे पत्रकारितेतील नवे बदल स्वीकारताना आपण संघटनाही मजबूत केली पाहिजे. जेव्हा आपण संघटित राहू, तेव्हा पत्रकारितेवरील सर्व प्रकारचे हल्ले परतवून लावण्यात यशस्वी होऊ, यात शंका नाही.

(पूर्व प्रसिद्धी : वाड्मय यज्ञ २०२२. मराठी पत्रकार परिषद ४३ वे अधिवेशनानिमित्त प्रकाशित स्मरणिका)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा