दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, मनसेचे प्रमुख
राज ठाकरे आणि अभिनेत्री राखी सावंत
यांची वक्तव्य सध्या चर्चेत आहेत. त्याहीपेक्षा ती
विचार करयाला लावणारी आहेत. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नाही, मात्र
त्यांनी ज्या उदवेगातून ही विधाने केली आहेत, तो विचार करायला लावणारा आहे. ठाकरे
यांच्या वक्तव्यातून राजकारणातील तर या दोघांच्या वक्तव्यातून समाजातील विदारक
स्थितीचे दर्शन होत आहे. अर्थात अशा परिस्थितीत यावर मात करण्याचा उपाय सूचवायचा
की त्या परिस्थितीशी जूळवून घेत या सिस्टीमचाच एक भाग होण्याचा सल्ला द्यायचा हे
ठरवायला हवे.
महिला दिनाच्या शुभेच्छा देताना वर्मा यांनी
महिलांना सनी लिओनीसारखे व्हावे असा सल्ला
दिला
होता. त्यावरून वादंग सुरू झाले. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. या वादात राखी सावंतने उडी घेत वर्मा यांचे जणू समर्थन केले. '२०-२० वर्षांचा संसार
करून झाल्यावरही एखाद्या पुरुषाला एखादी हॉट बाई मिळाली तर तो बायकोच्या २०
वर्षांच्या सेवेला, प्रेमाला एका रात्रीत विसरतो. तर मग महिलांनी आता
सनी लिओनच व्हावे'. असे राखीचे मत आहे. सामाजिक दृष्टया विचार केला तर पुरुषी
मानसिकता स्त्रियांकडे कशा नजरेने पाहते, हे अनेकदा स्पष्ट झालेले आहे. खरे तर
त्यात बदल करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत. मात्र, राखीने जो उदवेग व्यक्त केला,
तो पुरुषांना हवे तसे बनण्याचा म्हणजे एकप्रकारे पुरूषी मानसिकतेचे समर्थन करून
स्त्रियांना त्याप्रमाणे वागण्याचा सल्लाच दिला आहे. नाइलाज आहे म्हणून असेच
वागावे लागेल, अशी अपरिहार्यता यातून दिसते.
राज ठाकरे यांचे राजकारणाबद्दलचे
विचारही असेच आहेत. मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते म्हणाले होते, काम करून
लोक मते देत नसतील तर आम्हालाही अन्य पक्षांप्रमाणे वेगळे मार्ग स्वीकारावे
लागतील. ते स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत, हा शेवटचा पराभव आहे. पुढील निवडणूक
आम्ही कशाही पद्धतीने जिंकणारच आहोत... ठाकरे यांचे हे विधानही अशाच नकारात्मक
परिस्थितीतून आलेले आहे. आतापर्यंत मनसेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात होते.
वेगळे पायंडे पाडणारा, वेगळ्या वाटेने जाणारा पक्ष म्हणून मनसेकडे पाहिले जात
होते. अर्थात पक्षाची ही धोरणे प्रत्यक्ष मते मिळविण्यात कमी पडली. म्हणून आपली
मूळ वाट सोडून दुसऱ्या कोणाच्या मार्गाचे (की जो मार्ग वाईट आहे, असे आपणच म्हणालो
होतो) अनुकरण करणे ही मनोवृत्ती कोणता संदेश देणारी आहे?
यामुळे या दोन्ही विषयांवरील वक्तव्य
पराभूत मनोवृत्तीची आहेत. हा पराभव एकट्या त्या वक्तींचा मानायचा की, एकूणच
यंत्रणेचा? याचा विचार केला पाहिजे, असे वाटते.
- विजयसिंह होलम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा